मुंबई : दहावीच्या परीक्षांसाठी (10th Exam) राज्य सरकारनं (Maharashtra State) आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचा अर्थ परीक्षेविना पास होण्याचा मार्ग यंदाच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोकळा झालाय. मात्र परीक्षेविना दहावी पास तर व्हाल पण अकरावीत प्रवेशाचं काय? यासाठीही सरकारनं काही नियम घातले आहेत.  


आज शासननिर्णयाद्वारे याबाबत सरकारनं अकरावी प्रवेशासाठी (11th Addmission) काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. निर्णयात म्हटलं आहे की,  2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट 11 वी मध्ये प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय घेतला आहे. 10 वीची परीक्षा रद्द केल्यामुळे 2021-22 या  वर्षासाठी इ. 11 वी प्रवेशासाठी कार्यपध्दती ठरवण्यात आली आहे.  


अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा (CET)
1. इ. 11 वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.
2. सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
3. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
4. सदर सामाईक प्रवेश परीक्षा 100 गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
5. इ. 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.


Maharashtra Class 10 Exam Guidelines : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


सीईटी दिलेल्यांना 11 वी प्रवेशासाठी प्राधान्य


इ. 11 वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच  11 वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राहिलेल्या उर्वरित जागा  ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.


दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारच्या गाईडलाइन्स


दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारनं आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण असतील. गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक याआधारावर 20 गुण दिले जातील. तर नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर 50 गुण अवलंबून असतील. म्हणजेच, जे विद्यार्थी कोविड पूर्व काळात नववीत होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या निकालावर 50 गुण दिले जातील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीनं दिलेले गुण मान्य नसतील, त्यांच्यासाठी कोविड नंतरच्या काळात परीक्षा आयोजित केली जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं. त्याचप्रमाणे जूनच्या अखेरीस दहावीचा निकाल लावण्याचा सरकारचा मानस आहे, असंही त्या म्हणाल्या.