चंद्रपूर : दारूबंदीच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवून खळबळ उडवून देणाऱ्या वनिता राऊत यांनी जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमदार झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवणार, गाव तिथे बार सुरु करणार आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात दारू देणार या सारखी भन्नाट आश्वासनं देत वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी 286 मतं मिळाली होती. मात्र, त्यांच्या या निवडणूक जाहीरनाम्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली होती.


Chandrapur | 'गाव तिथे बार' सुरु करण्याची महिला उमेदवारांची अजब घोषणा 


गुरुवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर या निर्णयाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विशेषतः सोशल मीडियावर तर या बाबत प्रतिक्रियांचा अक्षरशः खच पडलाय. याबाबत प्रतिक्रिया देताना वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, सोबतच सरकारला आपला जाहीरनामा अंमलात आणण्याची विनंती देखील केली. त्यांच्या मते लोकांना सुविधा व्हावी यासाठी 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात बार सुरु केला पाहिजे. सोबतच दारू विकणारा आणि पिणारा या दोघांकडे पण परवाना असला पाहिजे. या सोबतच 25 वर्षाच्या खालील तरुणांना दारू पिता येणार नाही यासाठी सरकारने कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे.


लग्नाचं आमंत्रण आहे की 31 डिसेंबरचं? निमंत्रणातचं चक्क दारूची बाटली अन् चखणा! व्हिडीओ व्हायरल..


वनिता राऊत यांचा जाहीरनामा काय होता?
वनिता राऊत यांनी आपण निवडून आल्यास गडचिरोलीतील दारुबंदी हटवू असे आश्वासन दिले होते. मतदारसंघातली बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांना दारु विकण्याचे परवाने देऊ, दारिद्र्य रेषेखाली असणार्‍या लोकांना दारू खरेदी करताना सवलत देऊ, गाव तिथे बार सुरु करु, अशी अनेक आश्वासने दिली होती. तसेच 'गाव तिथे बार' ही योजना राज्यभरात सुरु करावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.


'माझे बाबा झिंगून घरात आलेलं आदित्य दादांना रुचेल का?' आदिवासी मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहलेलं पत्र व्हायरल


चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.