Maharashtra Corona Update: देशात कोरोना महामारीनं (Corona in India) कहर केला आहे. त्यात सर्वाधिक प्रकोप झाला तो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना (Maharashtra Corona Cases) रुग्णसंख्येसह सर्वात जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची (Maharashtra Corona Death) संख्या लाखाच्या वर गेली आहे. आता जरी कोरोनाचे आकडे कमी येत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात 100130 लोकांचा जीव गेला आहे. देशात आजपर्यंत साडेतीन लाखांच्या जवळपास मृत्यू नोंदवले गेले आहेत. याचा अर्थ कोरोनामुळं दगावलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती हा महाराष्ट्रातील आहे. दुसऱ्या क्रमांकांवर कर्नाटक आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात 70 हजार अधिक मृत्यू झाले आहेत.
दिलासादायक! राज्यात आज फक्त सातारा, कोल्हापूरमध्येच हजारच्या घरात रुग्णसंख्या
जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू
कोरोनामुळं भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. सध्या कोरोनाची साखळी काही अंशी तोडण्यात यश मिळालं आहे. देशासह महाराष्ट्रात आकडे कमी येत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे. फ्रान्समध्ये 1.09 लाख लोकांचा मृत्यू झाला. या यागीत रशिया (1,23,436 मृत्यू), इटली (1,26,472 मृत्यू), यूके (1,27,836 मृत्यू), भारत (3,46,784 मृत्यू), ब्राझील (4,72,629 मृत्यू) आणि सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत (6,12,203 मृत्यू) झाले आहेत.
राज्यात आज 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14 हजार 433 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,43,267 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.05 टक्के झाला आहे. आज 233 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,85,527 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 13,46,389 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत - मुख्यमंत्री
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले.