Maharashtra Corona Cases : राज्यात आज 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14 हजार 433 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,43,267 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.05 टक्के झाला आहे. आज 233 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,85,527 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 13,46,389 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यात आज फक्त सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजाराच्या घरात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यात साताऱ्यात 1 हजार 148 आणि कोल्हापूरमध्ये 1 हजार 152 रुग्णांची नोंद झाली आहे.


राज्यात मृतांता आकड एक लाखावर


राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची (Maharashtra Corona Death) संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 130 मृत्यू झालेत. देशात साडेतीन लाखांच्यावर मृत्यू नोंदवले गेले आहेत. याचा अर्थ कोरोनामुळं दगावलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती हा महाराष्ट्रातील आहे.  दुसऱ्या क्रमांकांवर कर्नाटक आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात 70 हजार अधिक मृत्यू झाले आहेत. 


राज्यात उद्यापासून अनलॉकला सुरुवात
जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे.


अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. 


पहिल्या स्तरात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या स्तरात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.