Maharashtra Corona Update :महाराष्ट्रात आणि देशात वाढत्या कोरोना (Maharashtra Corona Cases) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.  महाराष्ट्रात आठवड्याला टेस्टचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटले, सोबतच कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे आणि 10 टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहित माहिती दिली आहे. 


पुढील काळात येणाऱ्या सणांमध्ये गर्दीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करण्याचं आवाहन देखील  केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे. 


राज्याला 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचं देखील आवाहन  केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे. महाराष्ट्रात मागील एका महिन्यात 2 हजार 135 सरासरी रुग्णसंख्या प्रति दिवस नोंद होते आहे.  काल 5 आॅगस्ट रोजी महाराष्ट्रात 1 हजार 862 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 


देशात गेल्या तीन दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग किंचित कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


महाराष्ट्रात शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,95,954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.