मुंबई : राज्यात आज 5539 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 859 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 30 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 


राज्यात आज कोरोनामुळे 187 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 483 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (80), अमरावती (90), वाशिम (93),  गोंदिया (92), गडचिरोली (28)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 834अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


धुळे, नंदूरबार, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,91,72,531 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,41,159 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,35,516 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,837 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 309 कोरोना बाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 309 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 407 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,14,166 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4345 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1631 दिवसांवर गेला आहे.


देशात गेल्या 24 तासात 44643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


देशात शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 44,643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 464 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 41,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


केरळात वाढता प्रादुर्भाव 


केरळात गुरुवारी कोरोनाच्या 22,040 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या वाढून 34.93 लाखांवर पोहोचली आहे. तर 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17,328 वर पोहोचली आहे.