मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.01% एवढे झाले आहे. राज्यात आज 816 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,46,129 सक्रीय रुग्ण आहेत.
लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र, लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.
18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती
राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी आता 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.