परभणी : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या हाताला काम उरले नाही. या बेरोजगारांच्या यादीत कवींची भर पडलीय. सततच्या लॉकडाउनमुळे परिस्थिती खालावल्याने प्रसिद्ध कवी संतोष नारायणकर यांच्यावर कविता विकण्याची वेळ आलीय. त्यांनी आपली व्यथा फेसबुक पोस्टद्वारे मांडलीय.


सध्याचं धगधगत वास्तव ज्या कवीने आपल्या कवितेतुन मांडलंय तेच परभणीचे प्रतिभावंत कवी संतोष नारायणकर यांच्यावर चक्क आपल्या कविता विकण्याची पाळी आलीय. मागच्या दीड वर्षभरापासुन कोरोनामुळे सर्व ठप्प झालंय. ना रोजगार आहे ना काही सुरु आहे. त्यातच कवितेचे कार्यक्रमही बंद, कविसंमेलन होत नाहीयेत अशा परिस्थितीत आपला प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न कवी संतोष नारायणकर यांच्या समोर पडलाय. मध्यतंरी त्यांनी ऑटो चालवला. मात्र, कडक लॉकडाऊन लागले आणि तेहि बंद झाले. त्यानंतर एका शाळेवर सेवक म्हणुन काम मिळाले. परंतु, शाळाही बंद झाल्याने तोही रोजगार गेला. घरी जे होते त्याच्यावर आतापर्यंत धकलं. मात्र, पुढे कस होणार या नैराश्येतुन त्यांनी थेट आपल्या सर्व कविता विक्रीस काढल्यात.


संतोष यांना 2 मुली 1 मुलगा तिघांचेही शिक्षण सुरूय. आई आणि पत्नीही घरीच असतात. संसाराचा गाडा मोठा आहे, त्यातच मागच्या वर्षभरापासुन ते आणि त्यांच्या पत्नी कसाबसा आपला गाडा हाकताहेत. मात्र, आता परिस्थिती कठीण झालीय. त्यामुळे पती संतोष यांनी केवळ कविता न करता पहिल्यापासुनच इतर काही केले असते तर आज ही वेळ आली नसती अशी भावना त्यांच्या पत्नीन व्यक्त केलीय.


आजवर 'ऐका ऐका दोस्तांनो, मायबापाची कहाणी, माय नारळी खोबरं, बाप नारळाचं पाणी. यासारख्या तब्बल 3 हजारपेक्षा जास्त कविता संतोष यांनी लिहिल्यात. ज्यातील अनेक कविता आज अनेकांच्या ओठांवर आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे आपली आयुष्याची सर्व पुंजी एका कवीला विकावी लागतेय हे दुर्दैव म्हणावं लागेल.