Maharashtra Corona Cases : राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.94 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 156 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 3 कोटी डोसचा टप्पा
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 3 कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सातपर्यंत सुमारे 4 लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली. आज दुपारी 3 कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे. लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत 3 कोटी 2 लाख 71 हजार 606 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात 4 लाख 80 हजार 954 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल
राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.