Maharashtra Political News: विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा (Maharashtra Congress) अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, राजीनाम्याच्या पत्रात थोरातांनी आपण काँग्रेसच्याच विचारांनी पुढे जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात केलं आहे. 


विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील कलह टोकाला गेल्याचं सर्वांसमोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्तानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे. 


बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं. त्यानंतर नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. पण विधीमंडळ पक्षनेते हे महत्त्वाचं पद बाळासाहेब थोरात यांच्याकडेच होतं. पण आता बाळासाहेब थोरात यांनी या पदाचाही राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 


हायकमांडला लिहिलं होतं नाराजी व्यक्त करणारं पत्र


महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका आल्या की, काहीतरी राजकीय नाट्य पाहायला मिळतंच. गेल्यावेळी शिंदेंनी बडंखोरी केली आणि यावेळी काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली. सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला आणि ते जिंकले. पण, त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडी अजूनही थांबलेल्या नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरात यांच्यासह विदर्भातील काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी केल्या होत्या. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत नाना पटोले यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करायचं कसं, असा प्रश्न थोरात यांनी पत्रात उपस्थित केला होता. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही पटोले यांच्याविरोधात तक्रार केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर नाना पटोले त्याचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप त्यांनी केला होता. तर, नाना पटोले यांची भूमिका ही वेगळ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची होती. पण आमच्या आग्रहापायी काँग्रेसनं दिलेला उमेदवार निवडून आला. आता त्याचं श्रेय पटोले घेतायत, अशी तक्रार विदर्भातील नेत्यांनी हायकमांडकडे केली होती.