On This Day In History : प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व असते. इतिहासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी आज 7 फेब्रुवारी रोजी घडल्या. इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, पुण्यात आजच्या दिवशी पहिले चित्रपटगृह सुरू झाले होते. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं...


1812: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म


चार्ल्स डिकन्स हे इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक होते. आपल्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकप्रिय कादंबऱ्या, लघुकथा, नाटके यांचे लेखन केले.  अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. त्यांनी बॉझ या टोपणनावाने देखील लिखाण केले होते. 


1856 : ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले


ब्रिटिशांनी  ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातील अनेक संस्थाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. सोळाव्या शतकात मुघल साम्राज्याचा हिस्सा असलेल्या अवध राज्यावर ब्रिटिशांनी 1856 मध्ये नियंत्रण मिळवले. नवाब वाजिद अली शहा यांना तुरुंगात टाकण्यात आले. ते अख्तरप्रिया आणि जान-ए-आलम या नावांनी ओळखले जाणारे अवधचे शेवटचे नवाब होते. कालका-बिंदासारख्या कलाकार बंधूंना आपल्या दरबारात आश्रय त्यांनी दिला होता. वाजिद अली यांना शास्त्रीय संगीत आणि नृत्याची आवड होती. 


1873: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म


थॉमस अँड्र्यूज हे एक ब्रिटिश व्यापारी आणि जहाज बांधणी करणारे उद्योजक होते. ते उत्तर आयर्लंडमधील बेलफास्टमधील हार्लंड आणि वुल्फ या जहाज बांधणी कंपनीच्या मसुदा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख होते. टायटॅनिक या विख्यात जहाजाचे ते रचनाकार होते. टायटॅनिक जहाजाला आपल्या पहिल्याच प्रवासात अपघातामुळे जलसमाधी मिळाली होती. 


1915 : पुण्यात पहिले चित्रपटगृह सुरू


गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. या चित्रपटगृहात 'हिऱ्याची अंगठी' हा प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता. मूकपटाच जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्यांच्या टापांच्या आवाजासाठी नारळाची करवंटी वाजवली जात असे. 


1920: स्त्रीपात्रे असलेला पहिला चित्रपट सैरंध्री प्रदर्शित


 प्रख्यात बाबुराव कृष्णराव मेस्त्री  उर्फ बाबूराव पेंटर यांच्या 'महाराष्ट्र फिल्म कंपनी'ने तयार केलेला 'सैरंध्री' हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित झाला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते. या दृश्यात कोणतीही ट्रिक न वापरता ही दृष्य परिणामकारक झाले होते. पडद्यावरील हे दृष्य पाहून काही प्रेक्षक बेशुद्ध पडले होते. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली. 


1934: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म


हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि निर्माता शमशेर सिंह उर्फ सुजीत कुमार यांचा जन्म झाला. आराधना या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. गंगा कहे पुकार के, दंगल, विदेशिया, माई के लाल, आदी लोकप्रिय भोजपुरी चित्रपटात काम केले होते. भोजपुरी सिनेसृष्टीतील ते सुपरस्टार होते.


1938: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन


अमेरिकन व्यापारी, आणि फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचे निधन यांचे निधन झाले. ऑटोमोबाईल टायर्सच्या पहिल्या जागतिक निर्मात्यांपैकी एक होते. 


1971: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.


स्वित्झर्लंडमधील महिलांना फेब्रुवारी 1971 मध्ये सार्वमतानंतर फेडरल निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला. 1 फेब्रुवारी 1959 रोजी महिलांच्या मताधिकारावर पूर्वीचे सार्वमत घेण्यात आले होते आणि स्वित्झर्लंडच्या बहुसंख्य (67%) पुरुषांनी ते नाकारला होता. महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी दीर्घकालीन संघर्ष करावा लागला होता.