कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. या आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. शाहू समाधी स्थळी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारी पाहण्यासाठी संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला.
खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले की, "उद्याचं आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस धरायचंय का? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोललं पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. उद्याच्या आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदारांना आपण निमंत्रित केलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील"
"आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. उद्या कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.", असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी संपर्क साधला. पोलिसांचाही समावेश होता. आम्ही त्यांना स्पष्ट केलंय की, हे मूक आंदोलन आहे. राज्यभरातील समन्वयक येणार आहेत. त्यामुळे त्यांची व्यवस्था करणं हीसुदधा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. कोरोना नियमांचं पालन करुन सोशल डिस्टन्सिंग ठेवून, अंतर ठेवून शांतपणे आंदोलन करु. कोणताही गदारोळ न करता. उद्या कोणताही गदारोळ होणार नाही, ही सावधगिरी आपण सर्वांनी पाळलं पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की, कोल्हापूरकरांनी नेहमी एक दिशा दिली आहे.", असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
मराठा आरक्षणप्रश्नी दोन्ही राजेंची चर्चा, भेटीनंतर संभाजीराजे-उदयनराजे यांनी काय सांगितलं?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली. तर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं उदयनराजे म्हणाले. पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली.
संभाजीराजे म्हणाले की, "आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्याचं घराणं एकत्र आलं याचा मला आनंद आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात."
"आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. संभाजीराजे यांच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणावर राजकारण सुरु आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका," अशी संतापजनक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष आंदोलन बोलवण्याची मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :