लातूर : ते आले... त्यांनी पाहिले.. पुन्हा (भर दुष्काळात) आश्वासनाचा पाऊस पाडून ते गेले... लातूरच्या महाजनादेश यात्रेच्या दोन दिवसाचे हेच काय ते फलित, असे म्हणायची वेळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. कारणं देखील तशीच आहेत. या दोन दिवसाच्या यात्रेत स्थानिक प्रश्नांना बगल देत तेच ते मुद्दे पुन्हा जनतेच्या माथी मारण्यात आले. गेल्या 5 वर्षात जनतेचा आशीर्वाद घेऊन गेलेले मुख्यमंत्री आता तरी पदरी काय टाकतील? अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे निराशाच पडली आहे.


लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस होते. महाजनादेश यात्रेच्या निमिताने ते आले होते. दोन दिवसात पाच सभा आणि काही गावांना भेटी देत ते निघूनही गेले. भर दुष्काळात गावा-गावात फुल- तुरे अन हार घेऊन ज्येष्ठांपासून विद्यार्थीही रांगेत उभे होते. मात्र, काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा ताफा यायचा आणि निघून जायचा. त्यामुळे हा जनादेश आहे कि त्यांचा आदेश हे न समजण्यापलीकडचे होते.असो एका दिवसात अहमदपूर, उदगीर, लातूर तर दुसऱ्या दिवशी निलंगा आणि औसा करत त्यांनी उस्मानाबाद गाठले. प्रत्येक ठिकाणी तेच मुद्दे, तेच भाषण. फरक इतकाच की मतदारसंघातील परस्थिती लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधीला खुश करणारी घोषणा त्यांनी केली. आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका आहेत किमान यावेळी तरी स्थानिक मुद्द्यांना हात घालतील अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, राष्ट्रहिताचे मुद्दे सांगूनच हि निवडणूकही दामटून नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न सामान्य जनतेपासूनही लपून राहिला नाही. हटविण्यात आलेले 370 कलम, ग्रामसडक योजना, कर्जमाफी या लोकप्रिय घोषणांचा उल्लेख करण्यास मात्र त्यांना विसर पडला नाही.

31 ऑगस्ट अहमदपूर
अहमदपूरकरांची रेल्वेची मागणी बरीच जुनी आहे. याबाबत आमदार विनायकराव पाटील यांनी मागणी केली तोच धागा पकडून राज्य सरकार पन्नास टक्के आणि केंद्र सरकार पन्नास टक्के गुंतवणूक करतील. लवकरच ही मागणी पूर्ण होईल यासाठी रेल्वे मंत्र्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र अहमदपूर आणि चाकूर एमआयडीसीच्या विकासाचा मुद्दा तसाच राहिला.

31 ऑगस्ट उदगीर
हत्ती बेटास दहा कोटी रुपये निधी आणि शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पाठपुरावा जो कि लोकसभा निवडणुकीदरम्यानही करण्यात आला होता.

31 ऑगस्ट लातूर
लातूर शहराला उजनीचे पाणी देणार हे तीन वर्षांपूर्वीचे आश्वासन तसेच उद्योग धंदे वाढविणार आणि रेल्वे कोचच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार या घोषणांचा पाऊसही यात्रे दरम्यान झाला. जे जाहीर सभेत झाले तेच पत्रकार परिषदेत ही झाले.

1 सप्टेंबर निलंगा
463 कोटीचे अनुदान द्यावे, शिरुणतपळ ते गुलबर्गा रेल्वे जाळे उभा करावे यासंदर्भात पालकमंत्री संभाजी पाटील यांची मागणी अन मुख्यमंत्र्यांचे लगेच आश्वासन.

1 सप्टेंबर औसा
माकणी धरणातून औसा शहराला 45 कोटी रुपयांची पाणीपुरवठ्याची योजना दहा दिवसात मंजूर करून देणार असल्याचे सांगण्यात आले.

1 सप्टेंबर उस्मानाबाद
मेडिकल कॉलेज ची निर्मिती करू असे आश्वासन देण्यात आले.

बाकी संपूर्ण दोऱ्यात तेच भाषण.. तेच मुद्दे.. फक्त स्थानिक नेते मंडळींच्या नावात बदल करून महाजनादेश यात्रा दोन दिवसात जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून मार्गस्थ झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे सरकार पीक विमा बाबत काहीतरी निर्णय घेईल, असे अपेक्षित होते. पाण्याचा प्रश्न शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गंभीर आहे त्यावर काय उपाययोजना करतील असे सर्व सामन्यात विचार होता मात्र फलित काय ते मात्र संशोधनाचा विषय राहिला आहे.