पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असं विचारणाऱ्या अमित शाहांचा रोहित पवारांकडून खरपूस समाचार
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2019 11:21 AM (IST)
शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल अमित शाह यांनी केला होता. त्याला रोहित यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी माढ्यातून माघार घेतली. मात्र यानंतर रोहित पवार यांनी शरद पवारांना उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे पार्थ आणि रोहित पवार यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा रंगली होती. मात्र रोहित पवार यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं.
मुंबई : सोलापुरातील भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेचा त्यांचे नातू आणि जि. प. सदस्य रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल अमित शाह यांनी केला होता. त्याला रोहित यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. रविवारी(1 सप्टेंबर)ला सोलापुरात महाजनादेश यात्रेनिमित्त झालेल्या सभेत अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगावे असा सवाल त्यांनी केला होता. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. 'गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारायचा', ही दुटप्पी भूमिका असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यांवरही रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. 'सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आलीय. चांगली मशागत करुन ठेवुया. लवकरच ठरवुया', असं रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट : राजा एकाकी पडला? शरद पवारांनी जे पेरलं, तेच उगवलं का?