Chhatrapati Sambhaji Nagar News: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यात आले. त्यामुळे नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ दोन्ही बाजूने यासाठी दबाव निर्माण केला जात होता. त्यामुळे शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता उद्योजकांनी दोन आठवड्यापूर्वीच व्यक्त केली होती. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुढाकार घेण्याची विनंती देखील उद्योजकांनी केली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी याचे पडसाद शहरात पाहायला मिळाले. त्यामुळे उद्योजकांच्या हे पत्र गांभीर्याने घेतलं नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


शहराला वर्षानुवर्षे परिणाम भोगावे लागणार 


छत्रपती संभाजीनगर शहरात अशांतता निर्माण होण्याची भीती उद्योजकांनी दोन आठवड्यांपूर्वी व्यक्त केली होती. दरम्यान रामनवमीच्या पूर्वसंध्येला जे नको तेच झाले. शहरातल्या किराडपुरा भागापूर्ती ही घटना जरी मर्यादित असली, तरी याचे शहराला वर्षानुवर्षे परिणाम भोगावे लागणार आहेत. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. पण ही ओळख उद्योगामुळे मिळाली आहे. विशेष म्हणजे उद्योजकांनी या शहराला आणखीन एक ओळख दिली ती म्हणजे ऑटोहब सिटी म्हणून या शहराला ओळखले जाऊ लागले. स्कोडा, बजाज, व्हिडिओकॉन, व्हेरॉक या अशा मोठ्या कंपन्या शहरात दाखल झाल्या आणि यावर अवलंबून असणारे हजारो उद्योगही सुरू झाले. लाखो नागरिकांना काम मिळालं. पण हीच इंडस्ट्री सध्या अस्वस्थ आहे आणि त्याचं कारण आहे पुन्हा एकदा शहरात सुरू झालेलं अशांततेच वातावरण. त्यामुळेच इथल्या उद्योजकांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अशांतता कमी करण्याचे आवाहन करत पत्र लिहले होते. तर केवळ उद्योजकाच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील अशा परिस्थितीबद्दल शहराच्या पोलिस आयुक्तांना सांगितलं होतं.


उद्योजकांनी लिहलेल्या पत्रात काय म्हटले होते...



  • जी 20 परिषदेच्या आयोजनामुळे शहराचे एक नवे रूप आपण जगाला दाखवू शकलो.

  • जागतिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता आले

  • परंतु गेले काही दिवस शहर नामांतर आणि इतरही काही विषयावर शहर परिसरात अनेक परस्परविरोधी वक्तव्य केल जात आहे.

  • त्यामुळे सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करू शकेल अशी आशंका वाटते.

  • शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाच परवडणारे नाही.

  • कोणत्याही अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो.

  • या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.



मोठा फटका उद्योजकांना बसणार आहे. 


आधीच कोरोना आणि जागतिक मंदीच्या संकटामुळे उद्योग क्षेत्र संकटात सापडलं आहे. त्यातच आता पुन्हा असं काही घडल्यास याचा मोठा फटका उद्योजकांना बसणार आहे. विशेष म्हणजे उद्योजकांना बसलेला फटका तुमच्या घरापर्यंत येणार आहे हे विसरून चालणार नाही. कारण या याच उद्योजकांनी तुमच्या आमच्या सारख्या असंख्य कुटुंबाला रोजगार दिला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या वादाचे पडसाद आता उद्योगक्षेत्रावर? शहरातील तणावावरून उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र