चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिध्द 'वाघडोह' वाघाचा मृत्यू झालाय. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा गावाशेजारी असलेल्या जंगलात आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 17 वर्ष वय असलेल्या या वाघाने जवळजवळ सात ते आठ वर्ष ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्वतः चे अधिराज्य गाजवले.
ताडोबाच्या मोहर्ली, खातोडा आणि तेलिया च्या विशाल भूभागावर 'वाघडोह'चा एकछत्री अंमल होता. वाघडोह हा वाघ त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे 'scare face' या नावाने आणि 'big daddy of tadoba' म्हणून देखील प्रसिध्द होता. वाघडोह हा ताडोबातील किमान 40 पिल्लांचा पिता होता. 40 पेक्षा जास्त पिलांचा पिता, अतिशय मोठा आकार आणि नेहमी कुटुंबासोबत राहत असलेल्या या कुटुंबवत्सल वाघाला त्यामुळेच "big daddy of tadoba" हे नाव पडले होते. ताडोबा ला जागतिक कीर्ती मिळवून देण्यात वाघडोहचा सिंहाचा वाटा होता.
म्हातारा आणि अशक्त झाल्यामुळे 'वाघडोह' ला तीन वर्ष आधी इतर वाघांनी ताडोबातून हुसकावून लावले होते आणि तेव्हा पासून त्याचा चंद्रपूर शहराजवळील जंगलात वावर होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता. अशातच त्याचा आज मृत्यू झाला. वाघडोहच्या मृत्यू मुळे वन्यजीवप्रेमी अतिशय व्यथित झाले असून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.
संबंधित बातम्या :