चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये वाघांची (Tiger) संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर वन विभागाकडून (Forest Deparment) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूरमधील आठ वाघ सह्याद्रीच्या परिसरात सोडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चंद्रपूरमधील मोहर्ली येथील एका कार्यक्रमादरम्यान दिली आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (Natinal Tiger Conservation Authority) अधिकृत परवानगी मागितली असल्याचं देखील मुनगंटीवारांनी यावेळी म्हटलं आहे. 


जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूरमध्ये


चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये वाघांची लक्षणीय संख्या आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांचा संचार हा मोठ्या प्रमाणात आहे. जगातील फक्त 14 देशांमध्ये वाघ आढळतो. यामधील जवळपास 65 टक्के वाघ हे एकट्या भारतात आहेत. तसेच भारतासह संपूर्ण जगामधील वाघांची सर्वाधिक संख्या ही एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. या ताडोबामध्ये दोन वाघ हे नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच, इतर वाघांना देखील आता स्थलांतरित करण्याची योजना राज्य सरकारकडून आखण्यात येत आहे. 


राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना मानाचा दर्जा


ताडोबामध्ये अनेक पर्यटक व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येत असतात. अशावेळी त्या पर्यटकांचा सन्मान राखून त्यांना योग्य ती वागणूक मिळावी अशी अपेक्षा देखील मुनगंटीवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच देशातील ज्या सहा व्याघ्र प्रकल्पांना उत्तम नामांकनाचा दर्जा मिळाला आहे त्यातील तीन व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास 


यावेळी ताडोबामधील मोहर्ली गावाचा कायापालट होणार असल्याची माहिती देखील मुनगंटीवारांनी दिली आहे. मोहर्ली गावासाठी आकर्षक योजनांनी युक्त आराखडा तयार केला जाणार असल्याचं मुनगंटीवारांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच यामुळे ताडोबासह मोहर्ली गाव देखील एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येणार असल्याचा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 


त्यामुळे आता चंद्रपुरातच नाही तर सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.  त्यासाठी देखील योग्य योजना तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यासाठी परवानगी दिली की हे वाघ सह्याद्रीच्या जगलांमध्ये सोडण्यात येणार आहे. या वाघांचं दर्शन आता केवळ ताडोबामध्येच नाही तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये देखील होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Radhakrishna Vikhe Patil : पशुधनासाठी शासनाकडून 170 कोटी खर्च, लम्पी स्कीन निवारणासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न  : विखे पाटील