मुंबई : अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. 


दारुबंदी समितीसमोर सादर करण्यात आलेली निवेदनं बोगस, डॉ. अभय बंग यांचा आरोप


वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. अडीच लाख निवेदन दारू बंदी उठवा असे तर 30 हजार दारू बंदी कायम ठेवा या मागणीसाठी आली होती.  त्यानंतर पुन्हा एक समिती स्थापन केली होती. जिल्ह्यात क्राईम वाढले होते. महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. जनतेच्या सर्व घटकांसोबत बोलून झा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार दारू बंदी उठविली आहे, असं ते म्हणाले. 


डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी


वडेट्टीवार म्हणाले की,   झा समितीने अहवाल दिला, त्या आधारे मुख्यमंत्र्यांनी तो विषय कॅबिनेटमध्ये मांडला. महिला, मुले क्राईममध्ये अडकत होते. दारू माफिया बळकट झाला होता. तालुका- जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव पाडत होता. त्यामुळे दारू बंदी हटविणे गरजेचे होते. दारू बंदी हटवताना सामाजिक कार्यकर्त्यांशी झा समिती बोलली का? या बद्दल मला माहिती नाही आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणते मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत मला माहित नाही, असा टोला त्यांनी लगावला. 


चंद्रपूरमधील दारूबंदीचा पुनर्विचार केलेला नाही, अजित पवारांची अभय बंग यांना ग्वाही


अभय बंग यांचे दारुबंदीसाठी प्रयत्न
सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी कायम राहावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. या मुद्द्यावरुन बंग आणि वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वॉर देखील रंगले होते. समितीसमोर सादर करण्यात आलेली निवेदनं ही बोगस पध्दतीने भरण्यात आल्याचा आरोप डॉ.अभय बंग यांनी आरोप केला होता. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हिडिओ सादर केले होते.  अभय बंग यांनी दारू बंदीच्या विरोधात लोकांनी खरंच स्वयंस्फुर्तीने निवेदनं दिलीत का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अभय बंग म्हणाले होते की, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 24 लक्ष लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकांनी 'दारूबंदी नको' असे निवेदन दिले आहे, असे उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहे. गावातील एक दारू दुकान बंद करायला गावातील एकूण वयस्क किंवा महिलांपैकी किमान 50 टक्क्यांनी उपस्थित राहून दारू दुकानाविरुद्ध मत नोंदविल्यास सुरू असलेले दुकान बंद होते. मग याच न्यायाने सूरू असलेली दारूबंदी रद्द करायला किमान 12 लक्ष लोकांचे मत किंवा किमान 8 लक्ष वयस्कांचे मत हवे. या शासकीय निकषावरच ही 'मतमोजणी' पराभूत होते.