सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हात दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तालुक्यात दहा ठिकाणी विलगीकरणची व्यवस्था केली आहे. तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या व्यक्तीने स्वॅब दिला आहे, अशी व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्याच्या घरावर किंवा जमिनीवर दहा हजार रुपयांचा बोजा दंड म्हणून चढवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तालुक्यातील सरपंचांची बैठक घेऊन कोरोना रुग्णसंख्येत नियंत्रण आणण्या संदर्भात विविध उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यात येत्या 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात उपाययोजना ठरवण्यात आल्या. यात ज्या व्यक्तीने स्वॅब दिला आहे, अशी व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्याच्या घरावर किंवा जमिनीवर दहा हजार रुपयांचा बोजा दंड म्हणून चढवण्यात येणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी होम आयसोलेशन आजपासून बंद करण्यात आलं असून जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल अश्या व्यक्तींना संस्थात्मक विलागीकर कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तालुक्यात चाळीस ठिकाणी विलगीकरणाची व्यवस्था केली असून सद्यस्थितीत दहा ठिकाणी ही व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेर्ले कोव्हिडं सेंटर असलेली इमारत, आंबोली सैनिक स्कूल, माडखोल फार्मसी कॉलेज, रोणापाल स्वामी दयानंद संस्था, सांगली नवोदय विद्यालय, कोलगाव स्टेपिंग स्टोन स्कूल, सातार्डा हायस्कूल, माजगाव हायस्कूल, मळगाव हायस्कूल व मळेवाड शाळा नंबर 1 याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्या व्यक्तीचा कोव्हिडं पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याला थेट याठिकाणी हलवण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला लक्षणे आढळल्यास आणि त्याने स्वॅब दिल्यास त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तीने कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडता येणार नाही. जर संबंधित व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्याला दहा हजार रुपयांचा दंड किंवा त्या व्यक्तीने दहा हजार न भरल्यास त्याच्या घरावर अथवा जमिनीवर थेट बोजा चढवण्यात येणार आहे. कुठल्याही धार्मिक अथवा खाजगी कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही. या कार्यक्रमाला या अगोदर परवानगी दिलेली आहे. त्या कार्यक्रमस्थळी प्रशासनाकडून सक्त पहारा ठेवण्यात येणार आहे. मात्र, कोणी परवानगीशिवाय कार्यक्रम केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.