गडचिरोली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी फोन करुन चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा आदेश आपण दिला नसल्याचं स्पष्ट केलं, अशी माहिती डॉ. अभय बंग यांनी स्पष्ट केलं.
पूर्ण राज्यातील उत्पन्नाचा आढावा घेतला. त्यात उत्पादन शुल्क विभागाचाही आढावा घेतला. अधिकार्यांनी केवळ मला माहिती दिली. मी चंद्रपूरच्या दारुबंदीविषयी कोणताच आदेश दिला नाही. कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने चुकीची बातमी माध्यमांना दिली आहे. मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार माझा किंवा इतर कोणत्याही मंत्र्याचा नसून केवळ कॅबिनेटच तसा निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिल्याचं अभय बंग यांनी सांगितलं.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून दारुबंदीची समीक्षा करण्यासंदर्भात समिती गठनाची तयारी सुरु झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अभय बंग यांनी म्हटलं की, चंद्रपूर जिल्ह्याच्या दारुबंदीसाठी डॉ. राणी बंग यांनी ज्यावेळी अजित पवार यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी चंद्रपूरच्या दारूबंदीला पाठिंबा व्यक्त केला होता. पूर्वीच्या शासनाचे चांगले निर्णय रद्द न करता उलट ती अपूर्ण कामे या शासनाने पूर्ण करावी. प्रश्न चंद्रपूरची दारूबंदी उठवावी हा असूच नये, तर ती पुरेशी यशस्वी का झाली नाही व त्याची यशस्वी अंमलबजावणी कशी करावी हा असावा.
चंद्रपूरची दारूबंदी फसल्याची आरडाओरड होत आहे. पण त्यात काहीच तथ्य नाही. दारूबंदी लागू होण्यापूर्वी चंद्रपूरमध्ये लोक 190 कोटी रुपयांची दारु पित होते. बंदीनंतर वर्षभरातच ते प्रमाण 90 कोटींनी म्हणजेच 45 टक्क्यांनी कमी झाले. पण अंमलबजावणी नीट नसल्याने बेकायदेशीर दारु पसरत आहे. त्यामुळे आव्हान दारुबंदी उठवण्याचं नाही तर ती प्रभावीरित्या लागू करण्याचं आहे. अजित पवार उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपली क्षमता दारूबंदीच्या चांगल्या अंमलबजावणी वापरावी, अशी प्रतिक्रिया डॉ. बंग यांनी दिली होती.
मात्र माध्यमांमध्ये उत्पादन वाढीसाठी चंद्रपूरची दारूबंदी हटवण्याबाबत अजित पवारांची भूमिका अनुकूल असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या सर्व वृत्तांचे खंडन करत "चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा कोणताही प्रस्ताव मी मांडलेला नाही, तसे कुठलेही आदेश दिलेले नाहीत. मी केवळ राज्याच्या उत्पन्नाचा व उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. माझ्या नावानी कुणीतरी ही खोटी हुल उठवून दिल्याचंही अजित पवारांनी डॉ. बंग यांच्याशी फोनवर बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या
- दारुबंदीच्या विषयावरुन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे डॉ. अभय बंग यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले...
- डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी