त्र्यंबकेश्वर मंदिर
महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची वाढती संख्या बघता मंदिर प्रशासनाने पेड दर्शनाला सुरूवात केली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून पेड दर्शनाला सुरूवात करण्यात आली.
घृष्णश्वेर मंदिर
आज महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादेतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णश्वेर मंदिरात भाविकांनी गर्दी केली. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल झाले होते.
भीमाशंकर मंदिर
महाशिवरात्रीचा उत्सव हा देशभरात आनंदाने साजरा केला जातो. पुण्याहून 80 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या भीमाशंकर येथेही आज महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध राज्यातून भाविकांनी याठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक केला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर महादेवाचे मंदिर संपूर्ण विविध रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे. रात्री बारा वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलं.
परळी वैजिनाथ मंदिर
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैजिनाथाच्या दर्शनासाठी मंदीर सज्ज करण्यात आले आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे येथे लाखो भाविक आले होते. रात्रीपासुनच दर्शनाला रिघ लागलेली आहे.
औंढा नागनाथ मंदिर
महाशिवरात्रीनिमित्त आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे हर हर महादेव च्या गजरात लाखो भाविकांनी रात्रीपासून दर्शन घेतले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराचे दरवाजे मध्य रात्री नंतर सकाळी 2 वाजताच भाविकांनसाठी दर्शनास खुले करण्यात आले होते. यात पहिल्या दर्शनाचा लाभ अविनाश आकमार पानकनेरगाव येथील भाविकाला मिळाला असून त्यांचा नागनाथ संस्थांच्या वतीने पुष्पहार व नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातील अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, यशवंत गुरूपवार , यांच्या सह 13 अधिकारी बिग.डी.डी.एस,स्वान पथक,150 पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.