अकोला : काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात पत्राचा खेळ रंगला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबधी काँग्रेसकडून आघाडीच्या लेखी पत्राला प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारेच उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी चार पानी पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला लिहिलं आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना आघाडी सामील होण्यासंदर्भात लेखी प्रस्ताव दिला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकरांना प्रत्यक्ष हा लेखी प्रस्ताव दिला होता.


प्रकाश आंबेडकरांनी या प्रस्तावावर चार पानी पत्राद्वारे उत्तर देत काँग्रेसच्या आघाडीच्या हेतूवरच संशय व्यक्त केला. काँग्रेसनं वारंवार आपली भूमिका बदलल्याचा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रातून केला आहे. काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असल्याचा आरोप आंबेडकरांनी पत्रातून केला आहे.





आपण जुलैपासून काँग्रेसकडे आघाडीसंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. मात्र काँग्रेसनं आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं. आपली भूमिका जागांसंदर्भात नसून तात्विक मुद्द्यांवर असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसप्रणीत महागठबंधनमधील घटक पक्षांतील विधीतज्ज्ञ नेत्यांची समिती गठीत करण्याची मागणी आंबेडकरांनी पत्राच्या शेवटी केली आहे. या पत्रावर काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. आंबेडकरांच्या या पत्राला काँग्रेस काय उत्तर याकडे सर्वांचे लक्ष आहे.


संबंधित बातम्या


राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र


वंचित आघाडीला 6 जागा?, दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेत बदल