Maharashtra: राज्यातील बारावी CBSC परिक्षांच्या तारखा आणि राज्यातील सीईटीच्या तारखा एकत्र आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. 1 ते 4 एप्रिल दरम्यान एकीकडे सीबीएसई बोर्डाची परीक्षा असताना याच तारखांमध्ये बीसीए,बीबीए,बीएमएस, बीबीएम आणि त्यासोबतच 5 वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. राज्य सीईटी सेलने अलीकडेच विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र,यात काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिलं की 4 एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एमएएच-एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे.
सलग 3 दिवस बोर्डाचे पेपर त्यात CETही आली!
एक ते तीन एप्रिल दरम्यान बीसीए,बीबीए, बीएमएम,बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा नियोजित केल्या आहेत. याच एक ते तीन एप्रिल तारखेला बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षांचे इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स विषयांचे सलग तीन दिवस पेपर असणार आहेत. तर 4 एप्रिलला एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा नियोजित आहे. त्याच दिवशी बारावी सीबीएससी बोर्डाच्या सायकॉलॉजीचा पेपर असणार आहे. त्यामुळे सीईटी सेलने एक ते चार एप्रिल दरम्यानच्या परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षांचा सामना करावा लागणार आहे.
- 1 ते 3 एप्रिल: बीसीए, बीबीए, बीएमएम, बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा या कालावधीत नियोजित आहेत. त्याच वेळी सीबीएसई बोर्डाच्या इतिहास, भाषा आणि होम सायन्स या विषयांचे पेपर आहेत.
- 4 एप्रिल: पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा आहे, तर याच दिवशी सीबीएसई बोर्डाचा सायकॉलॉजी विषयाचा पेपर आहे.
वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी
परीक्षांच्या तारखा एकाच कालावधीत आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळ मिळण्याची गरज आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलला या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलने वेळापत्रकात बदल करावा आणि परीक्षांमध्ये होणारा गोंधळ टाळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
हेही वाचा: