Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावातील किरण कुर्मावार या आदिवासी टॅक्सी ड्रायव्हर तरुणीने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार केलं आहे. दररोज अनेक आव्हानांचा सामना करत रेगुंठा ते सिरोंचा या दुर्गम भागात टॅक्सी चालवत कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्या किरणची कहाणी दोन वर्षांपूर्वी एबीपी माझाने आपल्या बातमीतून दाखवली होती. लंडनमध्ये पदवीदान समारंभात पदवी स्विकारल्यानंतर किरणला आपल्या देशाचा झेंडा फडवल्यावाचून रहावलं नाही. आपल्या मेहनतीनं आणि उच्च शिक्षण घेण्याची धडपड पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी किरणने अथक प्रयत्न केले. लंडन येथील लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन मार्केटिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर किरणसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. परंतु, तिच्या या प्रयत्नांना सरकारची मदत मिळाली.
ज्यांच्या स्वप्नांना परिस्थितीच्या मर्यादा रोखू शकत नाहीत
एबीपी माझाने दाखवलेल्या या वृत्तामुळे किरणच्या संघर्षाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. आपल्या विशेष अधिकारांचा उपयोग करत शिंदे यांनी किरणसाठी 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. या मदतीमुळे किरणचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार झालं. किरणने नुकतंच लंडनच्या लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं असून पदवी प्रदान समारंभात सहभागी झाली आहे. तिच्या यशामुळे केवळ रेगुंठा गावच नाही, तर संपूर्ण गडचिरोली जिल्हा तिच्या अभिमानाने भारावला आहे. किरणचं यश हा जिद्द, मेहनत आणि धैर्याचा आदर्श आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्यांच्या स्वप्नांना परिस्थितीच्या मर्यादा रोखू पाहतात.
पदवीदान समारंभात फडकवला भारताचा झेंडा!
आपल्या मेहनतीनं परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार झाल्यानंतर किरणचा लंडनमध्ये नुकताच पदवीदान समारंभ झाला. लंडन येथील लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन मार्केटिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करत पदवीदान समारंभात किरणला आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याचा मोह आवरला नाही. स्टेजवर आपली पदवी घेतल्यावर गळ्यातून घेतलेला भारताचा झेंडा लंडनच्या विद्यापीठात फडकवत किरणनं आपला आनंद साजरा केला. तिच्या जिद्दीचं आणि संघर्षाचं राज्यात सगळीकडे कौतूक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
हेही वाचा: