औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देतांना, मराठवाड्यासाठी आज सिंचनाबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहेत. एकूण 14 हजार कोटींचा निर्णय सिंचन प्रकल्पाबाबत घेतला असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आजच्या बैठकीत एकूण 59 हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या 14 हजार कोटीचा समावेश आहे. 

Continues below advertisement


आजच्या बैठकीबद्दल मोठी चर्चा सुरु होती. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही बैठक झाली होती. राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकजण म्हणतात फक्त घोषणा होतात. पण, आतापर्यंत आमच्या मंत्रीमंडळाने सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


फडणवीस यांची प्रतिक्रिया...


बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गे लागली असून, 7 विषय प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.