औरंगाबाद :  शहरात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे या बैठकीची प्रशासनाकडून गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी सुरू होती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत होती. विशेष म्हणजे आज होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षाकडून शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील चौका-चौकात आणि रस्त्यांवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 


मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज शहरात असणार आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.  शहरातील चौका चौकात आणि मंत्रिमंडळाची बैठक होत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहे. शहरातील मंत्री, स्थानिक नेते, जिल्हाप्रमुख आणि महत्त्वाचे नेते यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनकडून बस स्थानकाकडे जाणाऱ्या आणि तेथून स्मार्ट सिटी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर असेच होर्डिंग पाहायला मिळत आहे. सोबतच विमानतळावरून शहराकडे जाणाऱ्या जालना रोडवर देखील असेच होर्डिंग पाहायला मिळत आहे. 


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन!


आगामी काळात विधानसभा,लोकसभा यासह स्थानिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्ष कामाला लागली आहेत. त्यातच औरंगाबाद शहरात आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने देखील सत्ताधारी राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता अनेक इच्छुक उमेदवार आजच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरातील मंत्र्यांकडून देखील अनेक ठिकाणी होर्डिंग लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.


लाखोंची जाहिरातबाजी!


आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने जोरदार जाहिरातबाजी करण्यात आल्याचा देखील पाहायला मिळत आहे. आज सर्वच महत्त्वाच्या दैनिकांच्या पहिल्या पानावर मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने जाहिराती देण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत या बैठकीच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय.


जेवणावर 30 लाख रुपयांचा खर्च


16 सप्टेंबरच्या दोन वेळच्या जेवणासाठी 1500 रुपये प्लेटप्रमाणे सुमारे 30 लाख रुपयांचा जेवणावर खर्च होणार आहे. यात मंत्री, सचिव, अधिकारी यांच्यासाठी हे जेवण असणार आहे. मंत्र्यांना हॉटेलमधून जेवण जाणार आहे. विशेष म्हणजे यावरूनच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Cabinet Meeting: मंत्रीमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील शाळांना सुट्टी; रस्ते बंद असल्याने घेतला निर्णय