मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज (30 डिसेंबर) विधीमंडळ परिसरात पार पडला झाला. एकूण 36 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे यांच्यासह 26 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचदरम्यान तीनही पक्षांमधील काही नेत्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे हे नेते पक्षांवर नाराज आहेत.


शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशातच आज मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही संजय राऊत यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे.

'आज शिवसेनेसह महाविकास आघाडीचा मंत्री मंडळ विस्तार झाला. या दरम्यान मंत्री मंडळात समावेश न झाल्याने सुनील राऊत नाराज असलयाचे वॄत पसरवण्यात आले. मी आमदार पदाचा राजिनामा देत असल्याचे परस्पर सांगण्यात आले. हे सर्व चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. मी शिवसेना आमदार असलो तरी आधी कडवट शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली या सारखी अभिमानाची गोष्ट दुसरी नाही. मी कोणत्याही कारणाने नाराज असलयाचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी हा खुलासा पुरेसा आहे.' असं स्पष्टिकरण सुनिल राऊत यांनी दिल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होत होती. तर अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अनुपस्थित होते. याबाबत बोलताना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण न मिळाल्यानं हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. ट्वीटमध्ये राजू शेट्टी म्हणाले की, 'ज्यांनी,ईडी,इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल.' तसेच हे ट्वीट शेअर करताना राजू शेट्टी यांनी '#व्वा_जानते_राजे...!' हा हॅशटॅग वापरला आहे.

संबंधित बातम्या : 

महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ

शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, तेच मित्रपक्ष शपथविधीला बेदखल; राजू शेट्टींची खदखद

मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर राज्यभरात जल्लोष; बारामती, नागपूर, बुलढाण्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह