सांगली : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवारी) पार पडला. विधानभवनात महाविकासआघाडीच्या 36 नेत्यांनी पद आणि गोपनितेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अनुपस्थित होते. याबाबत बोलताना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण न मिळाल्यानं हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजू शेट्टी यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.





ट्वीटमध्ये राजू शेट्टी म्हणाले की, 'ज्यांनी,ईडी,इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल.' तसेच हे ट्वीट शेअर करताना राजू शेट्टी यांनी '#व्वा_जानते_राजे...!' हा हॅशटॅग वापरला आहे.


दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व घटक पक्षांना सामावून घेऊ असं वारंवार सांगितले होते. एवढचं नाहीतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनीही सांगितले होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीत स्वाभिमान पक्षाच्या कोणत्याच नेत्याचं नाव नव्हतं. आज (सोमवारी) 1 वाजता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यावेळी राजू शेट्टी यांनी शपधविधीला जाणं टाळलं. एवढचं नाहीतर राजू शेट्टींव्यतिरिक्त इतरही पक्षांच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.


राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच वेळी भुषविणारा जिल्हा मंत्रीपदापासून वंचित


2003 ते 2004 या वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पद भुषविले तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. राज्यात इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भुषविणारा सोलापूर जिल्हा होता. मात्र हाच जिल्हा यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदापासून वंचित राहिलेला पाहायला मिळतोय. तर केंद्र सरकारमध्ये देखील सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिधींनी प्रतिनिधित्व केलं आहे. माढ्याचे खासदार असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रीपद भुषविलं तर सुशीलकुमार शिंदे यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. यंदा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 4 तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. माढ्यातून सहाव्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, यंदा हॅट्रिक करणाऱ्या काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे. आमदार भारत भालके, यांचे नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर होती. मात्र आज झालेल्या शपथविधीत सोलापुरातील एकाही नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश नाही. दरम्यान पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील नेत्यांचा समावेश असेल असा आशावाद राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ

शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?

मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर राज्यभरात जल्लोष; बारामती, नागपूर, बुलढाण्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Maharashtra Cabinet : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची ठळक वैशिष्ट्ये