मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला असून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादीने प्रत्येक मंत्र्यावर असलेल्या आरोपाचा दाखला देत टीका केली आहे.


 






काय म्हटलंय राष्ट्रवादीने?
आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील 40 दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. 


 






या मंत्रिमंडळात सर्व चेहरे हे भ्रष्टाचार, आणि अनियमित कामांसाठी ओळखले गेलेले चेहरे आहेत. अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यातील आरोपी आहेत तर संजय राठोड हे एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. बोगस पदव्या, वादग्रस्त वक्तव्य, अधिकाऱ्यांना दमदाटी, महाराष्ट्र विकत घेण्याची भाषा करणारे तानाजी सावंत असे लोक मंत्रिमंडळात आहेत.


स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या घडवलेल्या सुसंकृत राजकारणाला बट्टा लावून महाराष्ट्राची देशात बदनामी या शिंदे गट-फडणवीस सरकारकडून झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारच्या अन्यायी कारभाराला ताकदीने विरोध करेल.


आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांची यादी


शिंदे गटातील मंत्री 


गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)


भाजपतील मंत्री


राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)


शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये



  • आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली, तर शिंदे गटातून पहिल्यांदा शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील यांना मिळाला

  • विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. 'पुरुषप्रधान मंत्रिमंडळ' असा उल्लेख शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा करता येईल.

  • तर शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला असून मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं नाव ऐनवेळी आघाडीवर आलं.

  • भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपदाचा मान