Maharashtra Cabinet Expansion : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. दोन्ही नेत्यांकडून लवकरात लवकर विस्तार होणार असं सांगितलं जात असलं तरीही अद्यापपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त काही ठरलेला दिसत नाही. 


30 जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्याला आता जवळपास 21 दिवस उलटून गेले, परंतु महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता लवकरच विस्तार होईल एवढंच सांगत आहेत.


शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होईल असं सांगितलं जात आहे. पण या विस्ताराचा मुहूर्त कधी याबद्दल मात्र कुणीही बोलत नाही.


सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी?


उद्या 22 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. शिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दिल्लीत निरोप समारंभ आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे या दिवशी विस्तार होण्याची शक्यता कमी आहे


23 जुलै रोजी भाजप प्रदेश कार्यकारणी बैठक दिवसभर पनवेल येथे आहे


24 जुलै रोजी राज्यभर आदिवासी पाड्यावर भाजपकडून जल्लोष केला जाणार आहे


25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला जाणार आहेत. तर रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्नेहभोजन देखील दिले जाणार आहे.


22 तारखेपासून 25 तारखेपर्यंत रोज एक कार्यक्रम आहे. त्यामुळे या दिवसात विस्तार होण्याची शक्यता फारशी वाटत नाही. त्यामुळे नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 25 जुलैनंतरच होऊ शकतो. त्यामुळे पावसाळी अधिवेशन देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.


ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार?
पण अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असंही बोललं जातं आहे. 26 किंवा 27 जुलैला पीईसीची बाठक होणार ज्यामध्ये अधिवेशनाची तारीख आणि वेळ कळेल. एक चर्चा अशी ही आहे की मंत्रिमंडळ विस्तार करण्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौराही करतील. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ॲागस्टपर्यंतही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


तातडीने विस्तार की वेट अँड वॉच?
30 जून रोजी राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार अस्तित्त्वात आलं. आता त्याला 21 दिवस उलटून गेले आहेत. मात्र राज्याला नवे कारभारी मिळाले नाहीत. पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचा कारभारही ठप्प आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज बैठका घेत आहेत. दौरे करत आहेत  मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधक सरकारवर टीका करतात. त्यामुळे आता तरी शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करतात की आणखी वेट अँड वॉचची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.