Aaditya Thackeray : खाऊन ज्यांना अपचन झाले ते लोक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे गटानं केलेलं बंड नाही तर ही गद्दारी असल्याचा निशाणा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. आपल्याला राजकारण जमलं नाही हेच चुकलं असल्याचे ते म्हणाले. जिथे गेलात तिथे आनंदात राहा. तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं. ज्यांना ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे असल्याचेही ते म्हणाले. हे सरकार घटनाबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
माणुसकीशी गद्दारी
आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. या शिवसंवाद यात्रेनिमित्त भिवंडीत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा लगावला. तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलं. आमदारांनी फक्त महाराष्ट्राशीच नाही तर माणुसकिशी गद्दारी केली आहे. आमच्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला ते निष्ठेने आमच्यासोबत आहेत. त्यामुळं चांगल्या लोकांना राजकारणात स्थान असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही राजकारण केलं नाही हेच चुकलं
अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो. 24 तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आल्याते आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती
जे शिवसेना सोडून गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते म्हणतायेत की आम्ही उठाव केला बंड केल. पण त्यांनी केलेलं बंड नव्हते, तर ती गद्दारी आहे. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागला आहे. बंड आणि उठाव करायला ताकत लागते. बंड करायचे असते तर हे गुवाहाटीला पळून गेले नसते. बंड करायचे असते तर ते महाराष्ट्रात राहीले असते, पळून गेले नसते असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
धमकीला घाबरणार नाही
सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात पूर आलं आहे. लोक त्रस्त आहेत. शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. अशा काळात दोन लोकांचे मंत्रीमंडळ आहे. त्यामुळं हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार आहे. हे दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रातील लोक त्रस्त असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. काही लोक युवासेनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाबव आणत आहेत पण त्यांच्या धमकीला कोणी घाबरणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: