Shinde-Fadnavis govt : शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session) पूर्वी होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये शिंदे गटातील काही आमदारांना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.


पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला सरकार स्थापन झाल्यानंतर महिना लागला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल महिन्याहून अधिक काळ राज्याला मंत्रिमंडळ नव्हते. दोघेच जण सरकार चालवत आहेत अशी अनेकदा टीका देखील त्यांच्यावर झाली होती. त्यानंतर महिन्यानंतर भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी अनेक ठिकाणी एकाच मंत्री अनेक ठिकाणचे पालकमंत्री असल्यामुळे त्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे.


आमदारांच्या नजरा आता पुढील मंत्रिमंडळाकडे लागल्या


9 ऑगस्ट झालेल्या मंत्रिमंडळात एकूण 18 आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यानंतर अद्यापही 20 ते 22 मंत्रिपदं शिल्लक आहेत.  या मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. ज्या आमदारांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही, त्या आमदारांच्या नजरा आता पुढील मंत्रिमंडळाकडे लागल्या आहेत.


दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करताना काय आहे प्लॅन?


राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 42 जणांचा समावेश करता येतो. त्यामुळे  साधारणतः चार  आमदारामागे एक मंत्रिपद या प्रमाणे शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदे मिळू  शकतात. तर उर्वरित मंत्रिपदे भाजपच्या वाट्याला येतील. शिंदे आणि भाजपकडून छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात  संधी दिली जाईल.  भाजपकडून प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधताना आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांना मंत्री म्हणून संधी दिली जाईल. मात्र, हे करताना दोन्ही गटाकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. अशावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते असेही ही म्हटले जात आहे. तसेच  दोन्ही कोट्यातील मंत्रिमंडळातील 2 ते 4 जागा रिक्त ठेवल्या जाऊ शकतात.


शिंदे गटात कोणाच्या नावांची चर्चा आहे ?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय मंजुळा गावित, भरत गोगावले, बच्चू कडू, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम , प्रताप सरनाईक यांचीही नावं चर्चेत आहेत.