ठाणे: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचं नामकरण करा आणि भिवंडी निजामपूर शहर प्रभारी महानगरपालिका ठेवा अशी मागणी मनसेने केली आहे. भिवंडी पालिकेत नियमबाह्य पद्धतीने प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या असून अतिरिक्त कार्यभार सोपवताना मार्गदर्शक सूचनांच्या जीआरची पायमल्ली झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.
सध्या देशभरात आणि महाराष्ट्रातील विविध शहरांचे नामांतरणाचे लोण पोहोचलं आहे. अशातच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करा अशी मागणी मनसेच्यावतीने लेखी पत्र देऊन आयुक्तांना करण्यात आली. भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना पत्र देऊन पालिकेत नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभारी नियुक्त्या येत्या 13 ऑगस्टपर्यंत रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे.
जर 13 ऑगस्टपर्यंत याबाबत कार्यवाही केली नाही तर येत्या स्वातंत्र्यदिनी मनसे 15 ऑगस्टला भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर महानगर 'प्रभारी' महानगरपालिका करणार आहे असा माहिती मनसे युनिटचे अध्यक्ष संतोष साळवी यांनी निवेदन दिल्यानंतर एबीपी माझा दिली.
हे प्रकरण काय आहे?
5 सप्टेंबर 2018 च्या नियमाप्रमाणे अतिरिक्त कार्यभार सोपवताना मार्गदर्शक सूचनांच्या जीआरची पायमल्ली झाली आहे. शासनाच्या नियम व शर्तींचा भंग झाला आहे असा आरोप मनसेने केला आहे.
यामध्ये शिक्षण विभागातील नियुक्त्यांवर मनसेने बोट ठेवलं आहे.मनसेच्या दाव्यानुसार शिक्षण विभागातील नियुक्त्या या शैक्षणिक अहर्ता नसताना,कॅडर नसताना शिवाय शिक्षण विभागाचा अनुभव नसताना, वेतन समतुल्य नसताना देखील प्रभारी नियुक्त्या केल्या आहेत.
हे केवळ एक उदाहरण असून अशाच पद्धतीने संपूर्ण भिवंडी महानगरपालिकेत संपूर्ण विभागातच जवळपास 70 टक्के प्रभारी पदं नेमण्यात आली आहेत. त्यामुळे भिवंडी मनपाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे आणि करदात्या भिवंडीकर जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
मनसेचा आयुक्तांवर आरोप
या सगळ्यामुळे भिवंडी मनपाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. भिवंडी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजय कुमार म्हासाळ हे नियम बाह्य पद्धतीने प्रभारी पद दिलेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाहीत. त्यांना पाठीशी घालत आहेत असा थेट आरोप मनसेने आयुक्तांवर केला आहे.
हा नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेला हा कारभार तात्काळ बंद व्हावा आणि नियमबाह्य प्रभारी नियुक्त्या रद्द केल्या तर 15 ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर प्रभारी महानगरपालिका करेल अशी माहिती युनिटचे कार्यध्यक्ष सचिन पाटील यांनी म्हटलं आहे.
याबाबत आता आयुक्तांकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतंय आणि कुठली कार्यवाही होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.