मुंबई: गेल्या 40 दिवसांपासून रखडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार अखेर 40 व्या दिवशी झाला. आज एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.


उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदं
उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. मालेगावचे दादा भुसे (Dada Bhuse), जळगावचे गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले आहे. 


औरंगाबादला (Aurangabad) तीन मंत्रीपदं
शिंदे सरकारमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली आहे. अब्दुल सत्तार यांना शेवटच्या क्षणी संधी मिळाली. त्यामुळे औरंगाबादला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. औरंगाबादमध्ये आधीच दोन केंद्रीय मंत्री आहेत, आता तीन कॅबिनेट मंत्र्यांची भर पडली आहे.


संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा
या सगळ्यामध्ये संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. शिरसाट यांना शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना मंत्रिपद मिळणारच असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र या मंत्रिमंडळाच्या यादीत शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. पण आपण नाराज नसल्याचं संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केलं आहे.


पश्चिम महाराष्ट्राला चार मंत्रीपदं
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला तीन मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पाटणचे शंभूराज देसाई, मिरजचे सुरेश खाडे आणि सोलापूरच्या तानाजी सावंत यांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून निवडून आले आहेत, त्यांना मोठं मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची तर सुरेश खाडे यांना सांगलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. 


कोकणला दोन मंत्रीपदं
कोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे असून भाजपने कोकणातील एकाही नेत्याला संधी दिली नाही. दीपक केसरकर हे सुरुवातीपासून शिंदे गटासोबत असून ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. 


विदर्भातून दोघांना संधी
विदर्भातून स्वत: देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असून आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना भाजपकडून तर राठोड यांना शिंदे गटाकडून संधी देण्यात आली आहे. 


शिंदे गटातून नाराज कोण?
सुरुवातीपासून शिंदे गटासोबत असलेल्या औरंगाबादच्या संजय शिरसाठ यांना डावलल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. संजय शिरसाठ यांनी तर मंत्रीपदासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यांना मंत्रीपद मिळणारच असा दावाही त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. सोमवारी रात्री शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादही झाल्याची चर्चा आहे. 


बच्चू कडू यांनाही एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला होता, पण आजच्या यादीत त्यांना स्थान मिळालं नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनले पाहिजे. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे. एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार. मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल. नाराजी दूर नाही झाली तर अकेला बच्चू कडू काफी है. 


शिंदे गटातून भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, सदा सरवणकर आणि प्रकाश सुर्वे यांचीही नावं मंत्रीपदासाठी आघाडीवर होती. पण सध्या त्यांना संधी मिळाली नाही. 


दुसरीकडे भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आल्याने काही भाजप आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. 


रवी राणा नाराज?
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी उपद्रवमूल्य ठरलेल्या अमरावतीचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. पण आजच्या विस्तारात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. 


खातेवाटप कधी? 
राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार तर आज झाला. पण आता खातेवाटप कधी करणार असा सवा विचारला जात आहे. दरम्यान, खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयासोबत अर्थमंत्रालय असणार असल्याची चर्चा आहे.