मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ तर घेतली, पण अद्याप खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब मात्र झाल्याचं दिसत नाही. महत्त्वाची खाती आपापल्या पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांची चढाओढ सुरू असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे यांना हवी असलेली गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती तसेच दादांकडील अर्थखातं आता भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. त्या बदल्यात या दोघांना इतर खाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष बनला आहे. तसेच त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे अर्थ, गृह आणि नगरविकास खाती ही भाजपकडेच राहावीत, ती राष्ट्रवादी वा शिंदेंच्या शिवसेनेला देऊ नयेत असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.
सोमवार, 16 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या आधी म्हणजे 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे.
दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपला 20, शिंदेना 12 तर अजित पवारांन 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा झाल्याचीही माहिती आहे.
तर सरकारला काही 'अर्थ' नाही
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. जर अजित पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही या बातम्यांत तथ्य असेल तर मग या सरकारही 'अर्थ' नसल्याचं मोठं वक्तव्य मिटकरींनी केलं. या सरकारमध्ये अजितदादांशिवाय अर्थमंत्री पदासाठी दुसरा कुणीच योग्य व्यक्ती नसल्याचं म्हटलं. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय.
अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोडांना विरोध
आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला असल्याची माहिती आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही असल्याची माहिती आहे. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: