मुंबई शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात 40 रुपयांवरुन 500 रुपये अशी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जवळपास 40 वर्षानंतर विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतक्या वर्षानंतर विद्यावेतनात वाढ झाली असली तरी विद्यार्थी संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम कमीच असल्याचे मुद्दा विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना 1983 पासून 40 रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनासाठीदेखील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतरच्या विद्यावेतनात मागील 40 वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या आणि शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती. 


या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या मर्यादेत आहे अशा सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून दरमहा 500 रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येईल. याकरीता शासनावर दरवर्षी 75.69 कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.


विद्यार्थी संघटनांची नाराजी


आयटीआय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी स्टुडंट्स फेडेरशन ऑफ इंडियाने (SFI) मागील काही वर्षांपासून लावून धरली होती. आमची मागणी 2000 रुपये विद्यावेतनाची होती. मात्र, सरकारने फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ असमाधानकारक असल्याचे एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी म्हटले. आमदारांचे भत्ते वाढवण्यासाठी, प्रचार-जाहिराती आणि इतर अनावश्यक बाबींवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. मात्र, विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत, अशी टीकाही एसएफआयने केली आहे,. 



हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता प्रश्न 


मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. उत्तर देताना, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले होते. 



IIT अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये काय?


उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे. कामगारांच्या पद्धतशीर प्रशिक्षणाने कामगारांची गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन वाढवणे आणि शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे आदी आयआटीआय प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत. 


इतर संबंधित बातमी :