ITI Student Stipend: बातमीचं शीर्षक वाचून आपण म्हणाल की विद्यार्थी आणि आमदारांच्या (MLA Salary) भत्त्याची तुलना का बरं केलीय... पण ही तुलना करणं आजच्या घडीला गरजेची वाटली. कारण एक नाही दोन नाही तर तब्बल 41 वर्षांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा (ITI Maharatra) स्टायपेन म्हणजे विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1982 पासून हे विद्यावेतन आजतागायत फक्त 40 रुपयेच होते. 1982 साली 40 रुपयांची किंमत कदाचित जास्त असेल मात्र आज विसाव्या शतकात याची किंमत काय आहे हे सातत्यानं आपल्या भत्त्यांमध्ये वाढ करुन घेणाऱ्या आमदारांना किंवा सरकारला लक्षात यायला जरा वेळच लागला अशी भावना शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे. 


राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन 40  रुपयांवरुन 500 रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. इतक्या वर्षांनी का होईना काही सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याच्या उत्तरात सरकारनं हा निर्णय घेतला. एकूण 1200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाची मागणी यासाठी करण्यात आली आहे. 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सन 1982  पासून 40 रुपये आहे. यात वाढ करुन पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही विभागाच्या स्तरावर सुरू आहे. खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेश शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करून 100 टक्के प्रवेश होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात, तालुक्यात मागणीनुसार एमआयडीसी आणि उद्योगपुरक अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. स्थानिक कुशल कामगार आणि आयटीआयमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही मंत्री  लोढा यांनी सांगितलं.


फीसमध्ये  वाढ मात्र विद्यावेतनात बदल  नाही


सर्व समाजातील विद्यार्थी जे आयटीआयमध्ये प्रवेश घेतात, त्यांना 1982 पासून 40 रुपये विद्यावेतन दिलं जातं होतं. बरं आयटीआय प्रवेशासाठी जनरल म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक फीस भरावी लागते. एससी, एसटी आणि अन्य कॅटॅगरीतील विद्यार्थ्यांना  वार्षिक फी भरावी लागत नाही.  जनरल कॅटॅगरीच्या विद्यार्थ्यांना 2013 पासून 800, 1000, 1200 रुपये अशी अभ्यासक्रमानुसार फीस अदा करावी लागते. या फीसमध्ये काही वेळा वाढही झाली आहे. मात्र विद्यावेतनात बदल झाला नव्हता. 


राज्यात सद्यस्थितीत जवळपास सव्वा लाख विद्यार्थी आयटीआयमधून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आता 500 रुपये दरमहा मिळणार आहेत, असं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं. 


आमदारांचे भत्ते लाखांवर पोहोचले


आपण पाहतो की आमदारांच्या भत्त्यावर किंवा सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात आमदार राहत देखील नसलेल्या आमदार निवासावर लाखो रुपये खर्च केले जातात.  आमदारांना महिन्याकाठी तब्बल 1 लाख 82 हजार वेतन मिळतं. कोविड काळात यात तीस टक्के कपात करण्यात आली होती. मात्र कोविडच्या आधी  आमदारांना 1 लाख 82 हजार 200 रुपये वेतन मिळायचे तर  महागाई भत्ता 21 टक्के म्हणजेच 30  हजार 974 रुपये इतका मिळतो. फोन बिल, टपाल, संगणक चालक अशा अन्य सुविधांसाठीही त्यांना भत्ते दिले जातात. असं मिळून त्यांचं निव्वळ एकूण वेतन 2 लाख 40 हजार 973 रुपयांच्या वर जातं. हे वेतन आणि भत्ते 1982 सालापासून सातत्यानं वाढत आहेत. आधी हजारात होते आता लाखात गेले. मात्र आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा स्टायपेन वाढवावा असं कुठल्याही सरकारला इतके दिवस वाटलं नाही. 


आयटीआयला साधारणत: सर्वसामान्य कुटुंबातील मुलं प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांना केवळ आतापर्यंत 40 रुपये प्रतिमहिना विद्यावेतन मिळायचं. आज जर विचार केला तर नाश्ता करायचा म्हटलं तरी एका वेळेला 40 रुपये पुरत नाहीत. उशीरा का होईना सरकारला जाग आली हे महत्वाचं..


ही बातमी देखील वाचा


ITI Student Stipend: आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार