Ajit Pawar : राष्ट्रीय नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला विधीमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी जोडे मारल्याची घटना घडली. ज्यांनी अशी कृती केली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला असे जोडे मारणे योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमच्याकडेही जोडे असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचे थोरात म्हणाले.   


आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीने जनतेचे प्रश्न मांडले. पण दोन दिवसापूर्वी विधीमंडळ परिसरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. वेगवेगळी मते असू शकतात. भूमिका असू शकतात. परंतू महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा संस्कृती आहे. ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलं आहे. त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे, त्याच परिसरात हे जोडे मारण्याचे काम केल्याचे अजित पवार म्हणाले. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. अशी घटना कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत घडता कामा नये हे सांगितले. असं जर कोणी केलं तर त्यांना निलंबीत केलं पाहिजे अशी भूमिका आम्ही विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळं याबाबतचा निर्णय घ्यावा अशी विनंती अध्यक्षांना केल्याचे अजित पवार म्हणाले. 


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सावानिमित्त  दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या


ज्या सदस्यांनी राष्ट्रीय नेत्याबाबत चुकीची वक्तव्य केली आहेत. त्याबाबत तातडीनं निर्णय घेतला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रमाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशनात एक दिवस मराठवाड्यासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. पण याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सावाच्या निमित्तानं  2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले.


विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करावी : थोरात 


दोन दिवसापूर्वी विधीमंडळ परिसरात जे घडलं ते इतिहासात कधीही घडलं नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या बाबतीत निषेधार्थ घोषणाबाजी काही जणांनी केल्याचे थोरात म्हणाले. त्यांच्याकडे देखील राष्ट्रीय नेते आहेत.  आमच्याकडेही पायताने आहेत असे थोरात म्हणाले. त्यामुळं या घटनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करावी असे थोरात म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: 


Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई