मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यासंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आमदारांनी एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, अशी कोणतीही व्यक्ती सभागृहात बसली नसून ती प्रेत्रकांच्या गॅलरीत बसल्याचं विधीमंडळ सचिवालयाने सांगितलं आहे.
विधानपरिषदेत अज्ञात व्यक्ती बसल्याची तक्रार आमदारांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं आमदारांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. आमदारांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, एक अज्ञात व्यक्ती विधानपरिषदेमध्ये आमदार ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी येऊन बसला होता. या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना एक लेखी तक्रार दिली आहे.
तसा व्यक्ती हा प्रेक्षकांच्या गॅलरीत बसला होता, सचिवालयाकडून उत्तर
या संपूर्ण प्रकरणावर विधीमंडळ सचिव कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी हा दावा खोडून काढला आहे. विधीमंडळातील गॅलरीमध्ये जिथे सर्वसामान्य लोक बसू शकतात, त्याच ठिकाणी हा व्यक्ती बसला असल्याचं सचिवालयाने सांगितलं आहे.
Maharashtra Budget 2023: आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त
या आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहित संबंधित व्यक्तीची तक्रार केली आहे. त्यामुळे आता विधीमंडळातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचीही चिंता या आमदारांनी व्यक्त केली आहे. एखादा व्यक्ती सभागृहात येऊच कसा शकतो अशी विचारणा या आमदारांनी केली आहे. सभागृहाच्या दरवाज्यावर मार्शल्स असतात आणि ते या आमदारांना ओळखतात. तरीही एक अज्ञात व्यक्ती सभागृहात कशी येऊ शकते असाही प्रश्न विचारला जात आहे.
विधानपरिषदेत सोमवारी स्पष्टीकरण येण्याची शक्यता
आमदारांच्या या तक्रारीवर आता विधानपरिषदेत सोमवारी स्पष्टीकरण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही तक्रार खरी असेल तर ती गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.