Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा' असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी टीका केली आहे. सोयाबीन (soybean) आणि कापसाचा (Cotton) उत्पादन खर्च भरुन निघेल एवढाही भाव खासगी बाजारात नाही. त्यामुळे आज 70 ते 80 सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचं विशेष पॅकेज घोषित करणं गरजेचे होते. पण तसे अर्थसंकल्पात काहीच झाले नसल्याचे तुपकर म्हणाले.

  


अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 


शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं गरजेचं आहे. शेतीला पूर्णवेळ वीज मिळण्यासाठी आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून शेती पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतीला कंपाऊंड करण्यासाठी भरीव तरतूद करणं गरजेचे होते. तसेच 2022 खरीप हंगामातील घोषणा केलेली अतिवृष्टीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अद्याप अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मागचे सोडून द्यायचे अन् पुढच्या घोषणा करत सुटायच्या, असं रविकांत तुपकर म्हणाले. तसंच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे.


आतापर्यंत किती टेक्सटाईल पार्क उभे राहिले? 


संत्रा प्रकिया केंद्राची सरकारने घोषणा केली पण अशीच घोषणा 2015 साली टेक्सटाईल पार्कच्या बाबतीत केली होती. आतापर्यंत किती टेक्सटाईल पार्क उभे राहिले? असा प्रश्न देखील रविकांत तुपकरांनी उपस्थित केला आहे. 'लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही', असा टोलाही तुपकरांनी राज्य सरकारला लगावला.


दरम्यान, राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केला आहे. शहरी मतदारांना आकर्षित करणारा आणि स्वप्नांचा दुनियेत फिरवणारा हा अर्थसंकल्प असल्याची खोचक टीका रविकांत तुपकरांनी केली. 2014 पासून आजपर्यंत जेवढे अर्थसंकल्प झाले, त्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष झालेली अंमलबजावणी यांचे ऑडिट करण्याची मागणीही रविकांत तुपकरांनी केली आहे. 


कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद?


राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी 29 हजार 163 कोटींची तरतूद करण्यात आली. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी 43 हजार 36 कोटींची तरतूद करण्यात आली. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी 53 हजार 58 कोटी 55 लाखांची तरतूद करण्यात आली. रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा यासाठी 11 हजार 658 कोटी, तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी 13 हजार 437 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, महसुली तूट 16 हजार कोटींवर; असा रुपया येणार आणि असा खर्च होणार