Maharashtra Budget 2023 :  पुण्याच्या शाश्‍वत आणि गतीमान विकासाबरोबर शहराचे सांस्कृतिक वैभव जपणारा आणि सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक प्रगती करणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याच्या भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या. या अर्थसंकल्पामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार असून, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, व्यापारी यांचा हित साधणारा अर्थसंकल्प आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 


पुणे मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत 8 हजार 131 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे, असंही त्या म्हणाल्या.


आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांचे औचित्य साधून या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्राहालय, शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये आणि आंबेगाव येथील शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याच्या वार्षिक महोत्सव आराखड्यात शिवजन्मोत्सव शिवनेरीचा समावेश करण्यात आला आहे. वढू आणि तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील भीमाशंकर, ज्योतिबा या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार असल्याचा त्या म्हणाल्या. 


पुण्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प; जगदीश मुळीक


महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ठप्प झालेल्या पुण्याच्या विकासाला गती देणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून, मी त्याचे स्वागत करतो, असे मत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम हा अर्थसंकल्प करेल असा विश्‍वास वाटतो.