मुंबई : सध्या देशभरात राम मंदिराच्या निधी संकलनाच्या निमित्ताने भाजपनं मोठी मोहिम चालवली आहे. राज्यात देखील भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा जोर लावून धरला आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला उत्तर म्हणून आजच्या अर्थसंकल्पात मंदिरं तसेत तीर्थक्षेत्रांसाठी भरीव निधी आणि योजनांची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला.


Maha Budget 2021 | अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा


या अर्थसंकल्पात मंदिरं, तीर्थक्षेत्रासाठी भरीव घोषणा सरकारनं केली. यात मंदिरांच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही अजित पवारांनी केली. यावर बोलताना पवार म्हणाले की, आपल्या प्राचीन परंपरा, श्रध्दास्थाने व संस्कृतीचे जतन करणे हे आपले सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे. शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम म्हणूनच आमच्या शासनाने प्राधान्याने ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक आठ प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे त्यासाठी निवडली आहेत.


Maharashtra Budget 2021 : रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री 


या मंदिरांचं पहिल्या टप्प्यात संवर्धन


धूतपापेश्वर मंदिर ( ता.राजापूर,जि.रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर), एकविरा माता मंदिर,कार्ले (ता.मावळ,जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता.सिन्नर, जि.नाशिक), खंडोबा मंदिर,सातारा (ता.जि.औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव, जि.बीड), आनंदेश्वर मंदिर,लासूर (ता.दर्यापूर, जि.अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (ता.चामोर्शी, जि.गडचिरोली), या मंदिरांचा त्यात समावेश आहे. या कामांसाठी सन 2021-22 मध्ये 101 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.


तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारके




  • श्री क्षेत्र परळी वैजनाथ (ता.परळी,जि.बीड), श्री क्षेत्र औंढा नागनाथ (ता.औंढा, जि.हिंगोली), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.खेड, जि.पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

  • श्री क्षेत्र जेजुरी गड (ता.पुरंदर, जि.पुणे), श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता.इंदापूर, जि.पुणे), आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली) या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांकरीताही निधी उपलब्ध करून देणार.

  • श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर (ता.तिवसा, जि.अमरावती), संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगांव (ता.जि.अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

  • श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड (ता.कळवण,जि.नाशिक), संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर,त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक), श्री क्षेत्र भगवानगड (ता.पाथर्डी,जि.अहमदनगर), श्री क्षेत्र नारायण गड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड (ता.पाटोदा,जि.बीड) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

  • मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड,पाली तसेच सिध्दटेक या श्रध्दास्थानांच्या विकासासाठी “अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत” निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

  • संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव (ता.जि.हिंगोली) या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

  • संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा,जि.सोलापूर येथे स्मारक उभे करण्यासाठी सन 2021-22 मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

  • श्री क्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा,जि.वाशिम) विकास आराखड्याची कामे पूर्ण, करण्याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार.


महत्त्वाच्या इतर बातम्या :