Maharashtra BRS Political Crisis : आधी शिवसेना (Shiv Sena) आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी (NCP) पक्षात फुट पडल्याने दोन गट निर्माण झाले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. दरम्यान आता राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षात देखील मोठी फुट पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात 'औरंगजेब माझा आदर्श असल्याचं वक्तव्य करणाऱ्या बीआरएस पक्षाचे नेते कदीर मौलाना यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या बंगल्यावर पक्ष प्रवेश झाला. कदीर मौलाना यांना प्रवेश दिल्याने माजी आमदार तथा बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ही गोष्ट योग्य नसल्याचे देखील जाधव यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओ प्रसारित करत म्हटलं आहे की, ''कदीर मौलाना यांनी औरंगजेब माझा आदर्श राजा असल्याचं वैयक्तिकरित्या वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची ज्यानं अमानुषपणे हत्या केली, असा माणूस एखाद्याचा आदर्श कसा असू शकतो. त्यामुळे हे सर्व काय सुरु आहे, याची मी पक्षश्रेष्ठींना विचारणी केली होती. त्यावेळी ही कदीर मौलाना यांची वैयक्तिक भूमिका असून, अशी पक्षाची भूमिका नसल्याचं मला सांगण्यात आले होते. मात्र आज मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवास्थानचे काही फोटो पाहण्यात आले. ज्यामध्ये मुख्यमंत्री राव आणि कदीर मौलाना सोबत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या बंगल्यात जाणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे असे होणार असेल तर ते योग्य नाही. मी कोणत्याच पक्षात टिकत नसल्याचे अनेकजण म्हणतील, पण पदासाठी मी कधीच चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही', असंही जाधव म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात बीआरएस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना, औरंगजेब माझा आदर्श असल्याचं वक्तव्य बीआरएस पक्षाचे नेते कदीर मौलाना यांनी केले होते. यावरून आरोप होत असल्याने अशी कोणतीही भूमिका पक्षाची नसून, ते वक्तव्य कदीर मौलाना यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं बीआरएसकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार भानुदासराव मुरकुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी कदीर मौलाना देखील उपस्थित होते. त्यामुळे एकीकडे औरंगजेब माझा आदर्श असल्याचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीची भूमिका वैयक्तिक असल्याचं सांगायचं आणि दुसरीकडे त्याच व्यक्तीला थेट मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता यावर बीआरएस पक्षाची काय भूमिका असणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: