Government Employees Provident Fund: आपल्या मिळणाऱ्या पगारीतून भविष्याची तरतूद व्हावी म्हणून प्रत्येक सरकारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (Employees Provident Fund) गुंतवणूक करत असतो. कुणाला आपलं घर यातून बांधायचं असतं, तर कुणाला आपल्या मुलाच्या लग्नापासून शिक्षणापर्यंत खर्च करायचा असतो. मात्र भविष्य निर्वाह निधीची रक्कम मागच्या पाच महिन्यापासून राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांना मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. अशीच काही परिस्थिती राज्यभरात पाहायला मिळत आहे. तर याबाबत सरकराने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. 


भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न एकट्या कोणत्याही जिल्हा किंवा विभागाचा नसून राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या निर्वाह निधीसाठी केलेले अर्ज असे धूळ खात पडले आहेत. कर्मचाऱ्यांना तातडीच्या कामासाठी भविष्य निर्वाह निधी हवा आहे, तरी देखील त्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तर यासाठी अनेक कर्मचारी संबंधित विभागात खेट्या मारताना पाहायला मिळत आहे. 


एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 250 कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निंधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. तर यामध्ये तब्बल 31 कोटी रुपयांची रक्कम अद्यापही या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. अडचणीच्या काळामध्ये या पैशाचा उपयोग आपल्याला व्हावा म्हणून, अनेक कर्मचारी आपल्या अर्ज जिल्हा परिषदेमध्ये दाखल करत आहेत. मात्र बीडीएस प्रणाली बंद असल्याने पैसे मिळण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. 


कर्मचाऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट... 


भविष्य निर्वाह निधी मिळावा यासाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी आहे, तर कोणाच्या घरात लग्न सोहळ्याची तयारी सुरू आहे, तर कोणाला आपल्या घराच बांधकाम पूर्ण करायचं आहे. मात्र आपल्या आयुष्याची पुंजीच बीडीएस प्रणालीत अडकल्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर मोठ आर्थिक संकट उभं राहील आहे. शासकीय सेवेत असताना निवृत्तीच्या काळात वर्तमान सुखकर जावा आणि भविष्यात आर्थिक नियोजन करता यावं म्हणून हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये आपले पैसे गुंतवतात. मात्र आता निवृत्तीच्या काळातही या कर्मचाऱ्यांचे वर्तमानच अडचणीत आला आहे. 


मुलीचं लग्न पुढे ढकलण्याची वेळ...


बीड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात काम करणारे अंगद सोनवणे यांची देखील अशीच काही अडचण झाली आहे. संपूर्ण नोकरीच्या काळात पगारातून पै-पै जमा करून त्यांनी भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवले. तर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 15 लाख 80 हजार रुपयांचा भविष्य निर्वाह निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला. मात्र पाच महिन्यापासून बीडीएस प्रणाली बंद असल्याने त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना अजून मिळालेले नाहीत. त्यांना लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे अंगद सोनवणे यांच्यासारखीच परिस्थिती राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे सरकराने यावर मार्ग काढण्याची मागणी शासकीय कर्मचारी करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


EPFO Update : UAN नंबरशिवाय PF अकाऊंटवरून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया