Pune Bypoll election : पुण्यातील कसबा मतदार (Pune Bypoll Election) संघाच्या निवडणुकीत मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. त्यात महाविकास आघाडीची प्रचारयात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यांनंतर मनसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं. मनसेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या केलेल्या स्वागताची चांगलीच चर्चा झाली. अनेक तर्कवितर्क लावण्यात आहे. त्यावर आता मनसेने पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे.
'भेट घेणं अन् पाठिंबा देणं दोन वेगळ्या गोष्टी'
काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी पत्रकात लिहिलं आहे.
संभ्रम निर्माण करुन नये'
राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये, असंही स्पष्टीकरण त्यांनी मनसेकडून देण्यात आलं आहे.
या पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मनसे नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला मात्र प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मनसेवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यात सध्या सगळीकडे पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सगळ्या पक्षाकडून प्रचारासाठी पदयात्रा, सभा आयोजित केल्या जात आहे. कसब्यातील सगळ्या जनतेच्या भेटीघाटी घेणं सुरु आहे. प्रचारासाठी भाजपकडून मोठे नेते सहभागी होणार आहे. त्यात देशाचे गृहमंत्री अमित शाहदेखील येणार आहे.