Badlapur Crime : मालमत्तेच्या वादातून झालेलं पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीची बहिणीची नवऱ्याने हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये (Badlapur) घडली आहे. यात आरोपीने पत्नी आणि सासूवरही हल्ला करत जखमी केलंय. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. काय घडलं नेमकं?


बहिणीच्या नवऱ्याकडून मेहुणीची हत्या


बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत फरीदा सय्यद या त्यांच्या दोन मुली निलोफर आणि सनोबरसोबत राहतात. त्यांची मुलगी निलोफर ही विवाहित असून पतीसोबत वाद सुरू असल्याने ती आईकडेच वास्तव्याला आहे. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास निलोफरचा पती मोहम्मद आयुब शेख हा सासूच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायला आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला केला. या हल्ल्यात निलोफर ही गंभीर जखमी झाली, हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरीदा या दोघी तिला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला. 


मालमत्तेच्या वादातून हल्ला केल्याची पोलिसांची माहिती
यामध्ये सनोबरचा जागीच मृत्यू झाला, तर फरीदा सय्यद जखमी झाल्या. यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद शेख हा दुबईला कामाला होता. पत्नी निलोफर सोबत त्याचं पटत नसल्यामुळे ते दोघेही वेगळे राहत होते. मात्र जोगेश्वरी येथील मालमत्तेवरून या दोघांमध्ये वाद होते. याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केलाय.


दोघींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 


मालमत्तेच्या वादातून पती-पत्नीचे भांडण सोडवणे मेहुणीच्या जीवावर बेतल्याची समोर आले आहे. स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 


ही बातमी देखील वाचा


Shraddha Murder Case : आफताबने सिगारेटचे चटके दिले होते, तरीही श्रद्धाने त्याला दिली होती एक संधी