Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नव-नवीन माहिती समोर येत आहे. नुकतीच श्रद्धाच्या मित्राने एक धक्कादायक माहिती दिली आहे. 2020 मध्ये आफतापने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले होते. त्याचवेळी श्रद्धा आणि तिच्या मित्राने पोलिस ठाण्यात आफताबविरोधात तक्रार दिली होती. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याने श्रद्धाला घरी सोडले होते. श्रद्धाचा जवळचा मित्र रोहन रे याने एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिली आहे. 


रोहन रे याने दिलेल्या माहितीनुसार, तो आफताबला कधी भेटला नाही. परंतु, 23 नोव्हेंबर 2020 रोजी तो त्याला भेटला होता. त्यावेळी श्रद्धाच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि कमरेवर जखमेच्या खूना होत्या. त्यामुळे रोहन आणि त्याचा मित्र गॉडविन श्रद्धाला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी आफताबविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या दोघांनी श्रद्धाला तिच्या घरी सोडून आपापल्या घरी गेले.  


"या पूर्वी देखील आफताबने श्रद्धाला दोन ते तीन वेळा मारहाण केली होती. त्यामुळे ती खूपच घाबरली होती. शिवाय ती ड्रिप्रेशनमध्ये असल्यासारखी वाटत होती. पहिल्यासारखी ती मोकळेपणाने बोलत नव्हती. या सर्व घटनानंतर श्रद्धाने स्वत:च्या हाताने लिहून पोलिस ठाण्यात आफताबविरोधारत तक्रार दिली होती. ही घटना घडली त्यावेळी श्रद्धा आणि आफताब दोघे एकत्र राहात होते. परंतु, नंतर श्रद्धाने आपली तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर 2021 मध्ये त्याने शेवटचे श्रद्धाला पाहिले होते, अशी माहिती रोहन याने दिली. 
 
श्रद्धाचा दुसरा मित्र रजत शुक्ला याने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 2015 ते 2018 या कालावधीत तो आणि श्रद्धा एकत्र कॉलेजला जात होते. 2019 मध्ये तिच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी मला वाटत होते की, ती मला टाळत आहे. परंतु, नंतर समजले की, आफताबने श्रद्धाला तिच्या सर्व मित्रांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. आफताबने शाळा आणि कॉलेजच्या मित्रांसह घरच्यांपासून देखील श्रद्धाला दूर केले होते. आम्हाला वाटत होतं की, श्रद्धा आफताबला हॅंडल करण्याएवढी सक्षम आहे. 2021 मध्ये श्रद्धाने तिच्या जवळच्या मैत्रिणीला सांगितले होते की, आफताबने तिला सिगारेटचे चटके दिले होते. श्रद्धाची जवळची मैत्रिण आमची देखील मैत्रिण होती. या घटनेनंतर श्रद्धाच्या काही मित्रांनी आफताबच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली होती आणि पोलिस ठाण्यात तक्रार देखील देण्यास सांगितले होते. परंतु, श्रद्धाने या सर्वांना समजावून सांगितले आणि आफताबला एक संधी द्यावी असे सर्वांना सांगितले.  


रजतने सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी खूप दुर्लक्ष केलं. श्रद्धाने स्वत: आफताबविरोधात मारहाण करत असल्याची तक्रार दिली होती. शिवाय त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील श्रद्धाने आपल्या तक्रारीत म्हटले होते. परंतु, तक्रार दिल्यापासून जवळपास 27 दिवस पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर 27 दिवसानंती श्रद्धाने आपली आफताबविरोधातील तक्रार मागे घेतली.