मुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात नऊ कोटी लोकांना आतापर्यंत कोरोना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. हे कोणत्याही राज्यात सर्वाधिक आहे. राज्य सरकारने आज ही माहिती दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, बुधवारी संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील नऊ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी 2.76 कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोविड -19 लसीचे 75 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस
ठाणे जिल्ह्यात 75 लाखांहून अधिक डोस दिले
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीचे 75 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बुधवारपर्यंत ठाण्यात कोविड -19 लसींचे 75,32,755 डोस देण्यात आले होते.
त्यांनी सांगितले की, बुधवारी 54,857 लस टोचण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 50,85,862 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि जिल्ह्यात 24,46,893 लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
त्याचवेळी, ठाण्यात कोविड -19 चे 275 नवे रुग्ण आल्यानंतर जिल्ह्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 5,62,576 झाली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. अधिकारी म्हणाले की ही नवीन प्रकरणे बुधवारी समोर आली. संक्रमणामुळे आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,451 झाली आहे. जिल्ह्यात कोविड 19 मुळे मृत्यू दर 2.03 टक्के आहे.
राज्यात बुधवारी 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. बुधवारी राज्यात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 281 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.