Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) आणखी आजार उपचारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी म्हटले. विधानसभेत (Maharashtra Assembly Winter Session) आरोग्य खात्याच्या संदर्भात उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले.
डॉ. तानाजी सावंत यांनी म्हटले की, राज्यात स्वमग्नता, गतिमंद, न्यूरोजीकल आजारी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात 0.1 टक्के मुले या आजारांनी त्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक 160 मुलांमागे एक मुलाला हा आजार आहे. परंतु शासकीय, जिल्हा व निमशासकीय रूग्णालयात या मुलांवरील उपचारांच्या सुविधा खूप कमी असल्याचे त्यांनी म्हटले. खासगी रुग्णांलयात उपचारासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मुलांना उपचार मिळावेत याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावरील चर्चेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील जिल्हास्तरीय केंद्र उभारणीस बराच वेळ लागेल तोपर्यंत राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या उपचारांचा समावेश करावा अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा निहाय उपचार केंद्र सुरू करण्यासोबतच या रुग्णांवरील उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले. आत्ममग्नता आजाराने बाधित असलेल्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या मुलांना शैक्षणिक आरक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?
राज्य सरकारने जीवनदायी योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेत गंभीर आजारांचा खर्च समाविष्ट होता. त्यानंतर 2 जुलै 2012 रोजी या योजनेतील त्रुटी दूर करत राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. यामध्ये 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया, थेरपी आणि उपचार पद्धतींचा समावेश करण्यात आला होता. एक एप्रिल 2017 पासून ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. मोठ्या, गंभीर आजारावरील खर्चाचा भार सरकारकडून उचलला जात असल्याने जनतेला मोठा दिलासा मिळत आहे.