पुणे/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं आहे. सर्वच उमेदवार आता 24 ऑक्टोबरची म्हणजे निकालाची वाट पाहत असून उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. एकीकडे सर्वच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असताना काही ठिकाणी उमेदवारांनी मिरवणूक काढून, बॅनर्स लावून विजय साजरा केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचेदेखील बॅनर्स लागले आहेत.

चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे कोथरुड मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांचे आव्हान आहे. उद्या (24 ऑक्टोबर) विधानसभेची मतमोजणी होणार आहे. परंतु त्याच्या एक दिवस अगोदरच कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत.

काल (21 ऑक्टोबर) कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान पार पडल्यानंतर लगेचच मुश्रीफांची विजयी मिरवणूक काढली होती. मुश्रीफ यांनी गुलाल उधळत आनंद साजरा करत खास उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलरही उडवली.

दरम्यान, उद्या विधानसभा निवडणूक निकालानंतर जल्लोषासाठी भाजप प्रदेश कार्यालयात तयारी सुरु आहे. मुंबई, ठाण्यातील हजारो भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश भाजप सज्ज झालं आहे. उद्या निकालाचे कल स्पष्ट होताच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते कार्यलयात जल्लोषात सहभागी होणार आहेत.

यासाठी कार्यालयाबाहेर स्टेज, आसनव्यवस्था, निकालांच्या थेट प्रक्षेपणासाठी दोन स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत. 5 हजार लाडूंची ऑर्डरदेखील देण्यात आली आहे. भाजपने विजय निश्चित मानला आहे, मात्र किती संख्येने विजयी होणार, याकडे लक्ष असल्याचे भाजप कार्यालय प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा